जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

टेस्ला लवकरच घेऊन येत आहे मिलिअन माईल बॅटरी

खूप काळापासून प्रतीक्षेत असलेली दीर्घकाळ चालणारी बॅटरी लवकरच ‘टेस्ला’ बाजारात घेऊन येणार आहे. मिलिअन माईल या नावाने प्रसिद्ध असलेली हि बॅटरी टेस्लाने चीनच्या अॅम्परेक्स या कंपनी सोबत बनवलेली असून हिचे डिझाईन टेस्ला सीईओ एलॉन मस्क यांनी स्वतः निवडलेल्या तंत्रज्ञांनी केलेले आहे.

लिथीयम आयन बॅटरींच्या बाबतीत टेस्ला जगात अग्रेसर आहेच आणि आता या नव्या बॅटरीमुळे टेस्ला इतर कंपन्यांच्या बरंच पुढे निघून जाईल असं दिसतंय. या नव्या तंत्रज्ञानाबद्दल टेस्ला एप्रिलमधील बॅटरी डे च्या दिवशी गुंतवणूकदारांसमोर माहिती देणार होती, पण सध्या चाललेल्या कोविडच्या साथीमुळे हा बॅटरी डे अद्याप होऊ शकलेला नाही. या बॅटरी बद्दल बोलताना एलॉन मस्क यांनी ‘हि बॅटरी तुम्हाला पूर्णपणे आश्चर्यचकित करून टाकेल’, असं गुंतवणूकदारांना सांगितले आहे. या बॅटरीमुळे एका किलो वॉट अवरसाठी (बॅटरीची क्षमता मोजण्यासाठी वापरले जाणारे एकक) लागणारा खर्च १०० डॉलरच्या खाली येईल, ज्यामुळे विद्युत वाहनांची किंमत पेट्रोलवर धावणाऱ्या वाहनां इतकी खाली येईल असं या क्षेत्रातील तज्ञांना वाटतंय. जनरल मोटर्स देखील अशा प्रकारचे स्वस्त विद्युत वाहन एल जी केम या बॅटरी बनवणाऱ्या कंपनीच्या सहाय्याने बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

जनरल मोटर्सने गेल्या महिन्यात सांगितले कि त्यांची आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बॅटरी ७०% कमी कोबाल्ट (एक महत्वाचा आणि महाग घटक ज्याच्या उत्पादनाच्या प्रक्रियेत मजुरांना अमानुष परिस्थितीत काम करावे लागते) वापरेल. टेस्लाने तर फार पूर्वीपासूनच बॅटरीमधून कोबाल्ट काढून टाकायचा प्रयत्न केला आहे आणि ते लवकरच हे इप्सित साध्य करण्यात यशस्वी होतील असं कळतंय.

टेस्ला त्यांचं हे तंत्रज्ञान सर्वप्रथम चीनमध्ये आणणार आहे कारण चीनमध्ये विद्युत वाहनांचा खप जास्त तर आहेच पण विद्युत वाहनांची निर्मिती करण्यासाठी लागणारी विविध रसायने आणि साधने यांचे पुरवठादार देखील चीनमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत.