जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

सर्वमान्य आयसोट्रोपी सिद्धांताला छेद देणारं संशोधन ! विश्व सर्व दिशांना प्रसरण तर पावतंय पण एकसमान गतीने नाही !!

बिग बँग ने विश्वाचा जन्म झाला आणि त्यानंतर आजपर्यंत १३.८ अब्ज वर्षे होऊन गेली, विश्व अजूनही थोड हळू वेगाने पण प्रसरण पावतंय, इतकेच नाही तर आयसोट्रोपी सिद्धांतानुसार विश्व सर्वत्र एकाच वेगाने प्रसारण पावत आहे असे मानले जाते. या सिद्धांताला सर्वमान्यता आहे. परंतु या सिद्धांताला छेद देणारी काही निरीक्षणे गेल्या वर्षभरात नोंदविली गेली. या अनुषंगाने काही संशोधन देखील झालंय.

तर या नव्या संशोधनानुसार विश्व सर्वत्र एकाच वेगाने प्रसरण पावत नसून काही ठिकाणी ते अधिक वेगाने प्रसरण पावतंय तर काही ठिकाणी ते थोडं हळू प्रसरण पावत  आहे. या संशोधनासाठी जगभरातील तीन महाकाय दुर्बिणींमधील निरीक्षणांचा अभ्यास केला. यामध्ये नासाच्या चंद्रा ऑब्झर्वेटरी, इसा च्या एक्स एम एम न्यूटन ऑब्झर्वेटरी आणि जर्मनीच्या रोसात चा समावेश होतो. शास्त्रज्ञांनी ८०० दीर्घिका समूहांचा अभ्यास केला आणि त्यांनी प्रत्येक दीर्घिका समूहातील उष्ण वायूचे तापमान तसेच त्यांच्या तेजाचे मापन केले. एकाच अंतरावर असलेल्या दीर्घिकांचे तेज तसेच त्यांच्यामधील उष्ण वायूचे तापमान एकसारखे असायला हवे होते. पण शास्त्रज्ञांना असे आढळून आले नाही. याउलट शास्त्रज्ञांना या माहितीमध्ये  बऱ्यापैकी तफावत आढळली. इतकेच नाही तर त्यांना हा फरक अनियमित दिसून नाही आला. तर  त्यामध्ये नियमितता होती. म्हणजे ठराविक दिशेला असलेले दीर्घिका समूह हे अधिक वेगाने प्रवास करत आहेत तर ठराविक दिशेला असलेले समूह हे मंदगतीने प्रवास करताना आढळले.

सुरुवातीला शास्त्रज्ञांनी या निष्कर्षावर विश्वास ठेवला नाही. यामुळेच अवकाशातील वायू, धुळीचे महाकाय ढग इत्यादींमुळे तर अशी निरीक्षणे मिळत नाही आहेत ना हे तपासून पहिले. पण असे काहीच आढळून आले नाही. मग या मागे काय कारण असू शकेल? शास्त्रज्ञांना असे वाटते कि कृष्ण ऊर्जा म्हणजे डार्क एनर्जी मुळे हे घडत असावे. सध्या कृष्ण ऊर्जेबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही कारण तिचे निरीक्षण करणे शक्य नाही. पण शास्त्रज्ञ मानतात कि ती विश्वात सर्वत्र एकसारखी पसरलेली नाही आणि यामुळेच विश्व सर्व दिशांना एकसारखे प्रसरण पावत नाही आहे.