नोव्हेंबर 26, 2022

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

शुक्र ग्रहांवरील ढगांमध्ये फॉस्फिन वायु असल्याचे सापडलेत पुरावे ! जीवसृष्टी असण्याची शास्त्रज्ञांना वाटते दाट शक्यता !

नेचर या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार शास्त्रज्ञांना शुक्र ग्रहावरील ढगांमध्ये फॉस्फिन वायुचे पुरावे सापडले आहेत. हा पुरावा सापडल्याने संपूर्ण जगामध्ये एकाच खळबळ निर्माण झाली आहे. कारण हा वायु विषारी असला तरी तो एक तर मानव निर्मित उद्योगांमधून बाहेर पडतो किंवा तो काही सूक्ष्म जीवांकडून तयार केला जातो. या व्यतिरिक्त हा वायु निर्माण होण्याचा अन्य कोणताही नैसर्गिक मार्ग नसल्याचं शास्त्रज्ञाचं म्हणणे आहे.

शुक्र ग्रहावर जीवन असण्याची शक्यता शास्त्रज्ञांना फार पूर्वीपासून वाटत आहे. कारण या ग्रहाचा आकार, गुरुत्वाकर्षण आणि इतर बऱ्याच गोष्टी पृथ्वीसारख्याच आहेत. मात्र गेल्या शतकात शुक्र ग्रहावरील अवघड परिस्थितीची शास्त्रज्ञांना चांगलीच माहिती झाली. शुक्रावरील तापमान काही वेळा ९०० फॅरनहीट इतकं प्रचंड असतं. इतकेच नव्हे तर या ग्रहावर ६५ मैल उंचीपर्यंत ढग असून, यामुळे ग्रहाच्या पृष्ठभागावर हवेचा खूपच प्रचंड दाब असतो. अजून एक घातक गोष्ट म्हणजे शुक्र ग्रहावर कार्बन डाय ऑक्साइड मोठ्या प्रमाणात आहे, सोबत सल्फ्युरीक आम्लाचे ढगदेखील मोठ्या प्रमाणात आहेत.

या सर्व गोष्टींमुळे शुक्राच्या पृष्ठभागावर कुठल्याही प्रकारचे जीवन असण्याची शक्यता खूप कमी असली तरी शुक्रावरील ढगांमध्ये सूक्ष्मजीव असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं शास्त्रज्ञांना वाटतं. ढगांमध्ये आम्ल असले, तरी त्याबरोबरच तिथे सूर्यप्रकाश, पाणी आणि सेंद्रिय पदार्थ हे जीवनासाठी लागणारे मुलभूत घटक उपलब्ध आहेत हे खूप महत्वाचे आहे. विशेष करून शुक्रावरील ढगांच्या मधल्या भागात परिस्थिती बऱ्याच अंशी पृथ्वी सारखीच आहे. आतापर्यंतच्या काही संशोधनांमध्ये शुक्रावरील वातावरणाच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिनील किरण शोषले जात असल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले होते. यामागे सूक्ष्मजीव असू शकतात असे त्यावेळच्या शास्त्रज्ञांनी मांडले होते. परंतु गंधकाची काही संयुगे देखील यामागे असू शकत असल्याने या संशोधनाकडे फार कुतुहुलाने पहिले गेले नव्हते.

मुळात फॉस्फीन हा वायु जीवसृष्टीसाठी विषारी मानला जातो. या वायूचा वापर दुसऱ्या महायुद्धात देखील केला गेला होता. परंतु आता या वायुचे पुरावे सापडल्याने शुक्र ग्रहावर खरोखरच जीवसृष्टी आहे कि काय, याबद्दल सर्व जगाचे लक्ष लागून राहिले आहे.