नोव्हेंबर 26, 2022

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

शास्त्रज्ञांना सापडले अंटार्क्टिका वरील ९ कोटी वर्षांपूर्वीच्या वनांचे पुरावे

नुकत्याच सादर झालेल्या संशोधन प्रबंधामध्ये ९ कोटी वर्षांपूर्वी अंटार्क्टिकावर सदाहरित वने होती असे म्हटले आहे. संशोधकांच्या मते हा क्रेटेशिअस खंडाचा मधला काळ होता आणि या काळात पृथ्वीवर डायनासोर वावरत असत. या काळात समुद्राची पातळी आताच्या पातळीच्या तब्बल १७० मीटरने अधिक होती. या उष्ण हवामानामुळे अंटार्क्टिकावर आज आपण न्यूझीलंड मध्ये पाहतो त्या प्रकारची वने अस्तित्वात आली होती. या वनांचे पुरावे संशोधकांना झाडांच्या मुळांच्या तसेच परागकणांच्या जीवाश्मांच्या स्वरूपात २०१७ साली सापडले होते. यानंतर संशोधकांनी प्रयोगशाळेमध्ये कॉम्प्युटेड टोपोग्राफीचा वापर करून या भूभागामधील मुळांचे मोठे जाळे शोधून काढले. त्याचबरोबर त्यांना मातीमध्ये परागकण, बिया आणि फुलझाडांचे अवशेष सापडले. संशोधनांती शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला कि पश्चिम अंटार्क्टिकाचे सरासरी तापमान त्या काळात १२ से इतके होते तर उन्हाळ्यात हेच तापमान १९ से इतके होत असे. चार महिन्यांची रात्र असतानादेखील तापमान इतके जास्त असण्यामागे त्याकाळातील हवेतील कार्बन डाय ऑक्साईड चे प्रमाण हे होते. शास्त्रज्ञांनी सुरुवातीला त्या काळात कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण हे १००० पी पी एम इतके असेल असा अंदाज लावला होता परंतु आता शास्त्रज्ञांना असे वाटते कि हे प्रमाण ११२० ते १६८० पी पी एम इतके होते असावे.