जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

विश्वातील सर्वात शक्तिशाली स्फोटांपैकी एक – सुपरनोव्हा !

मानवी डोळ्यांनी दिसणाऱ्या सर्वात तेजस्वी स्फोटांपैकी एक म्हणजे सुपरनोव्हा. जेव्हा एखादा तेजस्वी तार्‍यामधील इंधन संपतं त्यावेळेस त्याचा मोठा स्फोट घडतो.यालाच सुपरनोव्हा म्हणतात. तर या सुपरनोव्हाबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया आज. कुठल्याही तार्‍याच्या केंद्रामध्ये आण्विक अभिक्रिया (न्युक्लियर फ्यूजन रिअॅक्शन) घडत असते आणि या आण्विक अभिक्रियेमुळे खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा तयार होत असते. ही ऊर्जा ताऱ्याला बाहेरच्या दिशेने ढकलत असते, परंतु त्याच वेळेला ताऱ्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे तारा आत खेचला जात असतो. कुठल्याही ताऱ्यामध्ये ही दोन बले समसमान असेपर्यंत तो तारा जिवंत असतो. जसं ताऱ्यामधील इंधन संपू लागतं तशी अण्विक अभिक्रिया आणि त्यापासून तयार होणारी ऊर्जा कमी होऊ लागते. परिणामी गुरुत्वाकर्षण बलाचं प्राबल्य वाढतं आणि तारा त्याच्या केंद्रस्थानाकडे कोसळू लागतो. जेव्हा एखादा पृथ्वीच्या कोट्यावधी वस्तुमानाचा तारा पंधरा ते वीस सेकंदात केंद्राकडे कोसळतो, त्यावेळेला त्याच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणावर कंपने आणि लाटा निर्माण होतात. त्या तार्‍याच्या पृष्ठभागाचा स्फोट होतो. यालाच म्हणतात, सुपरनोव्हा. सुपरनोव्हा वारंवार घडत नाहीत. आपल्या आकाशगंगेमध्ये दर शंभर वर्षांमागे दोन ते तीन सुपरनोव्हा घडतात. पण जेव्हा ते घडतात, तेव्हा त्यांचे तेज इतके प्रचंड असते की ते संपूर्ण आकाशगंगेच्या तेजापेक्षा अधिक तेजस्वी दिसतात आणि विश्वातील कुठल्याही कोपऱ्यातून दिसू शकतात. जेव्हा सूर्याच्या दहापट अधिक मोठे तारे सुपरनोव्हाच्या स्वरुपात फुटतात, तेव्हा ते मागे कृष्णविवर सोडून जातात.