जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

वापरलेल्या प्लास्टिकचे व्हर्जिन कच्च्या मालामध्ये रूपांतर करणारं इन्झाईम ! ९०% प्लास्टिक पुनर्वापर करण्यायोग्य बनवणारी पहिली प्रक्रिया !!

सध्याच्या जगात प्लास्टिक हि एक मोठी समस्या आहे हे कुणीही नाकारणार नाही. प्लास्टिक च्या विघटनावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे. आपण वापरात असलेल्या प्लास्टिक पैकी केवळ ३०% प्लास्टिकचा पुनर्वापर केला जातो. शिवाय हे रिसायकल केलेले प्लास्टिक मूळ प्लास्टिक इतके चांगले नसते.

विशेषकरून आपण जगात वर्षाकाठी ७०%पी ई टी  चे उत्पादन करतो. या पी ई टी च्या बाटल्या विविध रंगाच्या असतात. त्या उच्च तापमानावर तापवल्याने शिवाय  विविध रंगांच्याअसल्याने रिसायकलिंग केल्याने शेवटी तयार होणारे प्लास्टिक हे करड्या किंवा काळ्या रंगाचे असते. यामुळे या प्लास्टिकला फारशी मागणी नसते. सरतेशेवटी हे रिसायकल केलेले प्लास्टिक जाळले जाते किंवा त्याला कचऱ्यात टाकून दिले जाते.

मित्रांनो हा विषय काढायचे कारण म्हणजे या विषयावर आता एक आनंदाची बातमी मिळाली आहे. शास्त्रज्ञांनी एक असे एन्झाईम शोधलंय जे ९०% प्लास्टिकला त्याच्या मूळ वर्जिन स्वरूपात बदलून टाकते. आता हे एन्झाईम मोठ्या प्रमाणात कसे बनावट येईल यावर शास्त्रज्ञांचा विचार चालू आहे. २०१२ साली ओसाका जपान येथील शास्त्रज्ञांनी एल एल सी नावाचे एन्झाईम शोधले जे पी ई टी आणि इतर प्लास्टिक चे विघटन करू शकत होते. परंतु या एन्झाईमचा विघटनाचा वेग खूप कमी होता. तसेच पी ई टी च्या विघटनासाठी या एन्झाईम ने ७२ से या तापमानावर काम करणे आवश्यक होते, जे या एन्झाईमला शक्य नव्हते.  कारण या तापमानावर पी ई टी मऊ होते आणि एन्झाईम पी ई टी च्या आत खोलपर्यंत पोचू शकते.

एल एल सी चे री ईंजिनीअरींग करण्यासाठी कार्बीओस आणि तुलोज विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी एकत्र काम केले. या प्रकल्पामध्ये त्यांनी एल एल सी या एन्झाईम चा अभ्यास करून त्यामध्ये प्रचंड सुधारणा केली. त्यांनी एक असं नवे एन्झाईम बनवले जे जुन्या एन्झाईमच्या तुलनेत १०००० पट अधिक कार्यक्षम आहे. इतकेच नाही तर हे नवे एन्झाईम ७२ से तापमानावर काम पण करू शकते जी एक महत्वाची गरज होती . त्यांनी बनवलेल्या एका छोट्याशा संयंत्रामध्ये एन्झाईम वापरून चाचणी घेतली. हे एन्झाईम २०० ग्रॅम प्लास्टिकसह संयंत्रामध्ये टाकले असता दहा तासांमध्ये ९०% प्लास्टिकचे विघटन करून त्याचे टेरेथॅलेट आणि इथिलिन ग्लायकॉल मध्ये रूपांतर करू शकले. नंतर त्यांनी हेच पदार्थ वापरून नवे पी ई टी आणि या पी ई टी पासून प्लास्टिक बाटल्या बनवल्या तर त्या इतर प्लास्टिक बाटल्यांइतक्याच मजबूत होत्या.

हे एन्झाईम केवळ पी ई टी च्या दोन भागांमधील बॉन्डवर क्रिया करत असल्याने हे एन्झाईम चांगल्या प्रतीच्या पी ई टीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची निर्मिती करू शकेल. त्यामुळे या पुनर्निमितीसाठी लागणाऱ्या खर्चाची नेमकी माहिती उपलब्ध नसली तरीही संशोधकांना ते त्यांच्या उद्दीष्टामध्ये यशस्वी होतील असा विश्वास वाटतो.