नोव्हेंबर 26, 2022

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

रॉजर पेनरोज (अर्धे), रेनहार्ड गेंझेल आणि ॲंड्रीया घेझ या शास्त्रज्ञांना त्यांनी केलेल्या कृष्णविवराबद्दलच्या संशोधनाबद्दल यंदाचे भौतिकशास्त्रातील नोबेल

२०२० च्या भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाच्या घोषणा आज केली गेली. हे पारितोषिक रॉजर पेनरोज (अर्धे), रेनहार्ड गेंझेल आणि ॲंड्रीया घेझ या शास्त्रज्ञांना त्यांनी केलेल्या कृष्णविवराबद्दलच्या संशोधनाबद्दल देण्यात आले.रॉजर पेनरोज यांनी गणिताच्या आधारे कृष्णविवर बद्दल महत्त्वाचं संशोधन केलं. जरी कृष्णविवरे ही अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी मांडलेल्या सापेक्षतेच्या सिद्धांतावर आधारित असली, तरी स्वतः आईनस्टाईनना कृष्णविवरे प्रत्यक्षात असतील कि नाही, याबाबत शंका होती. परंतु १९६०च्या दशकामध्ये रॉजर पेनरोज यांनी सापेक्षतेचा सिद्धांताच्या आधारे कृष्णविवरांचे अस्तित्व सिद्ध केले. तसेच कृष्णविवरांबद्दल बरीच माहिती उपलब्ध केली. कृष्णविवरांच्या आत गुरुत्वबिंदू अथवा सिंग्युलॅरिटी असते, ज्या ठिकाणी काळ थांबतो आणि निसर्गाचे बरेचसे नियम लागू होत नाहीत, हि त्यातील महत्त्वपूर्ण माहिती. रॉजर पेनरोज यांचं हे संशोधन सापेक्षतेच्या सिद्धांतानंतरचं आईन्स्टाईननंतरचं सर्वात महत्त्वाचं संशोधन मांडलं जातं.


१९९० च्या दशकामध्ये रेनहार्ड गेंझेल आणि अॅंड्रिया घेझ यांनी केलेल्या स्वतंत्र संशोधनामध्ये आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या सॅजिटेरियस ए* या भागावर संशोधन केले. या दोन्ही स्वतंत्र संशोधनामध्ये उपलब्ध झालेली माहिती एकमेकांशी मिळतीजुळती असून आकाशगंगेच्या केंद्रस्थानी कृष्णविवर आहे हे या शास्त्रज्ञांनी सिद्ध केले. ४० दशलक्ष सूर्यांइतकं वस्तुमान असलेल्या या कृष्णविवराचे विविध वायूच्या आणि धुळीच्या महाकाय मेघांमुळे पृथ्वीवरून निरीक्षण करणे खूपच अवघड असतानादेखील उपलब्ध असलेली उपकरणे वापरून हे अतिशय अवघड असे संशोधन पूर्णत्वास नेल्याबद्दल आणि आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी कृष्णविवर आहे याबाबत सज्जड पुरावे उपलब्ध केल्याबद्दल या शास्त्रज्ञांना देखील भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक दिले गेले आहे.