जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

मेंदू मधील इम्प्लांटच्या सहाय्याने अंध व्यक्ती देखील पाहू शकल्या अक्षरे : ह्युस्टनमधील शास्त्रज्ञांचा प्रयोग

ह्युस्टन च्या बेयलर कॉलेज ऑफ मेडिसिनच्या संशोधक चमूने एक असा मेंदूमध्ये बसवायचा इम्प्लांट बनवलाय ज्यामुळे आंधळ्या व्यक्तींना देखील अक्षरांचे आकार दिसू शकतात. Cell (पेशी) या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनामध्ये शास्त्रज्ञांनी बनवलेले हे यंत्र समोरच्या दृष्यासंबंधीची माहिती कॅमेरा मधून डोळ्यांना न देता सरळ मेंदूमध्ये बसवलेल्या इलेक्ट्रोड इम्प्लांटना देते. हे यंत्र म्हणजे आंधळ्या व्यक्तींना पूर्णपणे डोळस बनवू शकणाऱ्या ‘कृत्रिम दृष्टी’ कडे ठेवलेले एक पाउल आहे. अर्थात असं परिपूर्ण यंत्र बनायला अजूनही खूप वर्षे बाकी आहेत. परंतु शास्त्रज्ञांनी केलेल्या या संशोधनाचे महत्व प्रचंड आहे. या संशोधनामध्ये शास्त्रज्ञांनी अत्यंत जटील असे संकेत विद्युत ठोक्यांच्या स्वरुपात मेंदूला पाठवले, ज्यामुळे सहभागी झालेल्या व्यक्तींना अक्षरे दिसू शकली. “आपले नातेवाईक कसे दिसतात किंवा आपल्या आजूबाजूचा परिसर कसा दिसतो हे जर आम्ही नजीकच्या भविष्यात दाखवू शकलो तर ती आमच्या अंध रुग्णांसाठी एक सुंदर भेट ठरेल.” असं योशोर, बेयलर कॉलेज च्या प्रमुख संशोधकांपैकी एक म्हणाल्या. परंतु सध्या तयार केलेलं यंत्र अजूनही खूपच साध्या स्वरुपात आहे आणि मेंदू हा एक महाजटील असा अवयव आहे. हे यंत्र ज्या मेंदूच्या ज्या भागात लावले होते त्या भागात म्हणजे ‘विझ्युअल कॉर्टेक्स’ मध्ये जवळ जवळ ५० कोटी न्युरॉन असतात आणि या वेळेस शास्त्रज्ञांनी या ‘विझ्युअल कॉर्टेक्स’ चा छोटासा भाग उत्तेजित केला व त्यासाठी मोजकेच इलेक्ट्रोड वापरले. आता यापुढील महत्वाच्या पायरीमध्ये शास्त्रज्ञ न्युरो इंजिनीअर्स बरोबर काम करून काही हजार इलेक्ट्रोड व्हिझ्युअल कॉर्टेक्समध्ये बसवतील. ज्यांच्या सहाय्याने ते मेंदूला अधिक अचूकतेने संकेत देऊ शकतील. पुढच्या टप्प्यात नवीन हार्ड वेअर आणि अल्गोरिदमच्या सहाय्याने शास्त्रज्ञ अंध व्यक्तींना दृश्य जगाचा आनंद प्राप्त करू देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करतील