जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

मानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर : S5 0014+81

S5 0014+81 हे मानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर आहे. याचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या वस्तुमानाच्या ४० अब्जपट असून (वर्षाला ४००० सूर्यांच्या वस्तुमानाइतका पदार्थ गिळतं हे कृष्ण विवर) हे कृष्णविवर सातत्याने पदार्थ गिळंकृत करत असल्याने या कृष्णविवराभोवती अत्यंत तेजःपुंज अशी तबकडी तयार झाली आहे. हे तेज आपल्या सूर्याच्या तेजाच्या ३०० पद्मपट (१ पद्म = १००० अब्ज) अधिक आहे किंवा इतर शब्दात सांगायचं तर आपल्या आकाशगंगेतील सर्व ताऱ्यांचं तेज एकत्रित पकडलं, तर त्या तेजाच्या २५००० पट अधिक तेजःपुंज आहे या कृष्णविवराची तबकडी. हे कृष्णविवर आपल्यापासून तब्बल १२.१ अब्ज प्रकाशवर्षे दूर आहे, पण जर हे कृष्ण विवर आपल्यापासून २८० प्रकाशवर्षे इतकं दूर असतं तर ते आपल्याला सूर्याइतकं तेजस्वी दिसलं असतं.

या कृष्णविवराची श्वार्झचाईल्ड त्रिज्या ११८.३५ अब्ज किमी आहे. हे अंतर सूर्य ते प्लुटो या अंतराच्या ४० पट आहे. (श्वार्झचाईल्ड वर्तुळ : कृष्णविवराभोवतीचे काल्पनिक वर्तुळ ज्याच्या आत गेलेली वस्तु कृष्णविवराकडेच खेचली जाते.)

आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे हे कृष्ण विवर बिग बॅंगनंतर ताबडतोब म्हणजे केवळ १.६ अब्ज वर्षातच निर्माण झाले. याचा अर्थ महाकाय कृष्णविवरे विश्वाच्या सुरूवातीच्या काळातच निर्माण झाली !