नोव्हेंबर 26, 2022

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

प्रॉक्झिमा सेंटॉरीकडून प्राप्त झालेत रेडिओ सिग्नल ! एलियन असण्याची कितपत शक्यता !!

प्रॉक्झिमा सेंटॉरी या सूर्यमालेच्या सर्वात जवळच्या तार्‍याच्या दिशेकडून रेडिओ सिग्नल प्राप्त झाल्यामुळे जगभरातील माध्यमांना उधाण आले आहे. एका वृत्तपत्राने तर एलियन पृथ्वीशी संपर्क साधण्यासाठी आटापिटा करत आहेत असं लिहून सर्वांवर कडी केली. सत्य काय आहे ? खरंच हा सिग्नल एलियन्सकडून प्राप्त झाला आहे का ? तर या प्रश्नाचे उत्तर ‘शक्यता आहे’ एवढाच आहे.

हा सिग्नल ऑस्ट्रेलियामधील पार्क्स या सिडनी जवळील रेडिओ टेलिस्कोपने पकडलेला आहे. (हा तारा केवळ दक्षिण गोलार्धातून दिसत असल्याने दक्षिण गोलार्धातील टेलिस्कोपच त्या भागातून येणारे रेडिओ सिग्नल पकडू शकतात.) या सिग्नलची वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी वर-खाली होत असल्याने ती पृथ्वीवरच्या अँटेनाकडून प्राप्त झाली असण्याची शक्यता खूप कमी आहे. परिणामी बहुधा हा सिग्नल अंतराळातून आलेला आहे. यात विशेष म्हणजे अशा प्रकारचे वारंवारता कमी-जास्त होणारे सिग्नल अथवा संकेत हे एखाद्या ग्रहाभोवती फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहातून निर्माण होऊ शकतात.अर्थात प्रॉक्सीमा सेंटॉरीच्या सूर्यमालेत कृत्रिम उपग्रह असणे तेथे असलेल्या एलियन्सबद्दल सुचवतो.

परंतु हा सिग्नल जर कृत्रिम उपग्रहापासून निर्माण झाला नसेल तर याचा स्त्रोत काय असू शकतो याचा विचार करणेदेखील महत्त्वाचे आहे. हा सिग्नल प्रॉक्सीमा सेंटॉरीच्या दिशेकडून येत आहे याचा अर्थ हा सिग्नल प्रॉक्सीमा सेंटरच्या मागे असलेल्या एखाद्या गोष्टीपासून येत असल्याची शक्यता नाकारता येत नाही‌. ही गोष्ट प्रॉक्सीमा सेंटॉरीच्या खूप मागेदेखील असू शकते.

अशाप्रकारचे सिग्नल हे प्रचंड चुंबकीय बल असलेल्या ग्रहांपासूनदेखील निर्माण होतात. परंतु इतक्या दूर असलेल्या ग्रहापासून प्राप्त होणाऱ्या रेडिओ सिग्नल खूपच मंद असणे अपेक्षित आहे. परिणामी हे सिग्नल एखाद्या ग्रहापासून येत असल्याची शक्यता खूप कमी आहे.

याव्यतिरिक्त आणखी एक शक्यता म्हणजे प्रॉक्सीमा सेंटरच्या मागे असलेल्या एखाद्या पल्सार किंवा कुस्सार ताऱ्या पासून देखील हा सिग्नल येत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु पल्सार किंवा क्वेसारमधून येणारे सिग्नलची बॅंडविड्थ खूप अरूंद असते. परिणामी शक्यता कमी वाटते. पण अर्थात अशक्य नाही. या सिग्नलमागे ग्रह अथवा पल्सार तारा असल्यास आपल्याला काहीतरी नवीन नक्कीच शिकायला मिळेल असं शास्त्रज्ञांना वाटतं.

याशिवाय अगदी आजूबाजूच्या परिसरात असलेली गोष्ट देखील अशा प्रकारचे सिग्नल निर्माण करू शकते. पाच वर्षांपूर्वी पार्क्स टेलिस्कोपला असेच रेडिओ सिग्नल मिळाले होते. ज्याबद्दल सर्व जग अवकाशात एलियन शोधत होतं. परंतु नंतर कळलं की हे सिग्नल पारस चार्ज परिसरातील मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये जेवण गरम करताना निर्माण झाले होते.