ऑगस्ट 14, 2022

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

पृथ्वीपासून सर्वात जवळचे कृष्णविवर फक्त १००० प्रकाशवर्षे अंतरावर आहे !

शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या सर्वात जवळच्या कृष्णविवराच्या नुकताच शोध लागला असून हे कृष्ण विवर पृथ्वी पासून १००० प्रकाश वर्षे अंतरावर टेलेस्कोपीअम या तारकासमूहामध्ये स्थित आहे. महत्वाची गोष्ट हि कि इतर कृष्णविवरांप्रमाणेच हे कृष्णविवर आपण दुर्बिणीनेदेखील पाहू शकत नसलो तरीही या कृष्ण विवरा भोवती फिरणारे दोन तारे आपण सध्या डोळ्यांनी पाहू शकतो. उघड्या डोळ्यांनी पाहताना हे दोन तारे वेगवेगळे भासत नाहीत तर आपल्याला एकच तारा दिसतो. परंतु हे तारे भारतातून किंवा उत्तर गोलार्धातून दिसत नसून ते दक्षिण गोलार्धातून दिसतात.

दक्षिण अमेरिकेमधील चिली मधील ला सिला दुर्बिणीतून या दोन ताऱ्यांचा अभ्यास करत असताना संशोधकांच्या लक्षात आलं कि या ठिकाणी दोन ताऱ्यांबरोबरच एक तिसरी गोष्ट लपलेली आहे त्याच्याभोवती हे तारे घिरट्या मारत आहेत. जरी हे कृष्ण विवर संशोधकांना दिसू शकलेले नाही तरीही या दोन ताऱ्यांच्या गतीचा आणि त्यांच्यावर होत असलेल्या गुरुत्वाचा काही महिने अभ्यास करून शास्त्रज्ञांना तिथे कृष्ण विवर असल्याची खात्री पटली.

या दोन ताऱ्यांपैकी एक तारा कृष्ण विवराभोवती दर ४० दिवसाला एक फेरी मारत असून दुसरा तारा मात्र तुलनेने जास्त अंतरावर असल्याने अधिक काळ घेत आहे. या कृष्णविवराचे वस्तुमान सूर्याच्या चौपट असून या तारे आणि कृष्ण विवराच्या समुच्चयाला HR ६८१९ असे नाव दिले गेले आहे. या कृष्णविवरानंतरचे सर्वात जवळचे आपल्याला माहित असलेले कृष्ण विवर आपल्यापासून ३००० प्रकाश वर्षे अंतरावर आहे. पण आपल्याला माहित नसलेले एखादे कृष्ण विवर आपल्यापासून यापेक्षाही जवळ असल्याची शक्यता नाकारता येत नाही. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार आपल्या आकाशगंगेत किमान काही दश लक्ष कृष्ण विवरे आहेत.