जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

नासाला खरंच समांतर विश्वाचे पुरावे मिळाले आहेत का ? काय आहे सत्य ?

गेल्या तीन चार दिवसात तुमच्यापैकी काही जणांनी नासा ला अन्टार्क्टिकावर समांतर विश्वाचे पुरावे सापडल्याच्या बातमीबद्दल वाचले असेलच. या विश्वामध्ये काळ उलट्या दिशेने प्रवास करत असण्याची दाट शक्यता वर्तविली जात असून काही लोक २०१९ मध्ये परत जाऊन सुखाचे जीवन जगण्यासाठी या समांतर विश्वात जाण्याची आस लावून बसले आहेत असं कळतंय 😃.

माफ करा. थोडासा विनोद केला. पण बऱ्याच बातामीपत्रांमध्ये नासाला समांतर विश्वाचे पुरावे सापडल्याचं अजूनही छापून येत आहे. परंतु नासा कडून अशी काही पक्की बातमी नाही आहे. झालंय काय, तर २००६ आणि २०१४ मध्ये नासाच्या अनुदानित प्रकल्पामध्ये नासाने सोडलेल्या फुग्याला (अन्टार्क्टिका इम्पाल्सिव्ह ट्रान्झियन्ट अन्टेना – ANITA ) न्युट्रीनो हे प्रचंड शक्तीचे मुलभूत कण सापडलेत – जे पृथ्वीमधून आल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलंय. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार पृथ्वीवर येणारे न्युट्रिनो हे अंतराळातूनच आलेले आहेत. तेंव्हा ANITA ने हे निरिक्षण नोंदवल्यापासून वैज्ञानिकांनी या विचित्र घटनेच स्पष्टीकरण देण्यासाठी विविध सिद्धांत मांडले असून त्यापैकी काही शास्त्रज्ञांनी समांतर विश्वाचा सिद्धांत मांडला आहे आणि यामुळे बरेच लोक उत्तेजित झाले. परंतु समांतर विश्वाचा अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही.

पेनिनसिल्वानिया स्टेट विद्यापीठाचे प्राध्यापक डेरेक फॉक्स म्हणाले कि जर हे न्युट्रीनो पृथ्वीच्या आतून आले असतील तर ते अंटार्क्टिकाच्या विरुद्ध बाजूला असलेल्या पृष्ठभागातून पृथ्वीच्या आत घुसले आणि अंटार्क्टिकामधून बाहेर पडले अशी कल्पना करणे चुकीचे ठरेल कारण, न्युट्रीनो पृथ्वीच्या आरपार जाणे शक्य नाही. प्राध्यापक डेरेक फॉक्स यांच्या मतानुसार सापडलेले न्युट्रीनो हे कृष्णद्रव्याचे कण असण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते कृष्ण द्रव्याचे जड कण पृथ्वीच्या गाभ्यामध्ये साठत असावेत आणि ते नष्ट होताना न्युट्रीनो निर्माण होऊन ते पृथ्वीच्या पृष्ठभागाबाहेर पडत असावेत. अर्थात हा देखील एक सिद्धांत आहे, ज्याची सत्यासत्यता अजूनही पडताळायची आहे.