जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

नव्या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची रशिया कडून चाचणी ! अमेरिका नाराज !

रशियाने नुकतीच एका नव्या उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली असून त्यामुळे अमेरिकन स्पेस फोर्स खूपच नाराज झाले आहे. १५ एप्रिलला चाचणी घेतलेल्या या क्षेपणास्त्र प्रणालीचे नाव डायरेक्ट असेन्ट अँटी सॅटेलाईट (DA – ASAT ) मिसाईल सिस्टीम असून हि प्रणाली पृथ्वीच्या जवळच्या कक्षेतील उपग्रहांचा नाश करू शकते. यापूर्वी रशियाचे दोन उपग्रह कॉसमॉस २५४२ आणि कॉसमॉस २५४३ अमेरिकेच्या गुप्तहेर उपग्रहाचा पाठलाग करत असल्याचे निरीक्षण यु एस स्पेस फोर्सने नोंदवले होते आणि यामुळे देखील अमेरिकन स्पेस फोर्स फारच नाराज झाले होते.

‘रशियाची DA – ASAT चाचणी हे अमेरिकेच्या आणि मित्र राष्ट्रांच्या अंतराळ प्रणालीला असलेले धोके वाढत असल्याचे उदाहरण आहे.’ अशा शब्दात
अमेरिकन स्पेस फोर्सचे कमांडर , जनरल रेमंड यांनी त्यांचा राग व्यक्त केला. उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र प्रणालीमुळे तयार होणार कचरादेखील इतर उपग्रहांना धोका पोहोचवू शकतो असे अमेरिकेचे म्हणणे आहे. भारताने मार्च २०१९ मध्ये जेंव्हा उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती त्यावेळेसदेखील नासाने नाराजी व्यक्त केली होती. नासाच्या मते भारताने घेतलेल्या चाचणीमुळे उपग्रहाचे जवळ जवळ ६० तुकडे झाले. ज्यातील काही तुकडे अमेरिकेच्या अंतराळातील प्रयोगशाळेला लागण्याची आणि त्यामुळे अंतराळवीरांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची भीती नासाने व्यक्त केली होती.

रशिया आणि चीन हि दोन्ही राष्ट्रे अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन या क्षेत्रात अधिकाधिक प्रगती करत आहेत. त्याचबरोबर यामुळे या राष्ट्रांबरोबर अमेरिकेचे ताणतणाव अलीकडच्या काळात काही प्रमाणात वाढले आहेत. यामुळेच अमेरिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे. आणि यासाठीच अमेरिकेने स्पेस फोर्स निर्माण केला आहे.

सध्या जगात उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र प्रणाली चीन, रशिया, भारत, इस्राईल आणि अमेरिका या देशांकडे असून अमेरिका या बाबतीत जगात खूप आधीपासून काम करत आहे.