जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

द ग्रेट अट्रॅक्टरचं रहस्य

आपली दीर्घिका हि लॅनिआकिआ या दीर्घिकांच्या महासमूहाचा भाग आहे. या दीर्घिका समूहामध्ये आपल्या आकाशगंगेसारख्या लाखो दीर्घिका आहेत. परंतु आपल्या दीर्घिकासमूहाबद्दल एक विशेष बाब आहे. त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत.

१९७० साली शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं कि आपली आकाशगंगा हि नरतुरंग या तारकासमूहाच्या दिशेने ६०० किमी/से इतक्या वेगाने सरकत आहे. हा वेग विश्वाच्या प्रसरणाच्या वेगाव्यतिरिक्त अधिकचा वेग होता. पुढील काही वर्षात शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं कि आपल्यापासून शेकडो दशलक्ष प्रकाशवर्षे अंतरातील इतर दीर्घिकादेखील याच दिशेने प्रवास करत आहेत. हि आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे नेमकं काय आहे, याची शास्त्रज्ञांना अद्याप उकल झालेली नाही. पण हि गोष्ट वैज्ञानिक जगतात ‘द ग्रेट अॅट्रॅक्टर’ या नावाने प्रसिद्ध आहे. हा आपल्या दीर्घिका महासमुहामधील सर्वाधिक घनतेचा भाग असून तो नॉर्मा समूह या नावाने ओळखला जातो. हा नॉर्मा समूह आकाशगंगेपलीकडील बाजूस असल्याने तेथून येणारे येणारे दृश्य किरण पृथ्वीपर्यंत पोचू शकत नाहीत. त्याचबरोबर आकाशगंगेतील बरेच तेजस्वी तारे आणि नॉर्मा समूह हे एकाच प्रतलात येत असल्याने हे तेजस्वी तारे त्यांच्या मागील बाजूच्या गोष्टींचे छायाचित्र घेणे अवघड बनवतात. तसेच आकाशगंगेतील दाट धुळीचे ढग इन्फ्रारेड आणि रेडिओ किरण वापरून देखील या भागाची माहिती मिळवणे अवघड बनवतात. परिणामी या समूहाची फारशी माहिती मिळवणे शक्य नाही. हे ठिकाण आपल्यापासून जवळ जवळ २२ कोटी प्रकाशवर्षे दूर असून या नॉर्मा समूहाचे वस्तुमान १००० पद्म सूर्य (१०००,००० अब्ज सूर्य) इतकं म्हणजेच हजारो दीर्घिकांच्या वस्तुमानाइतके आहे.

जरी नॉर्मा समूहाचे वस्तुमान प्रचंड असले आणि सर्व दीर्घिका त्याच्याकडे सरकत असल्या तरी केवळ नॉर्मा समूहाचे वस्तुमान या हालचालीला कारणीभूत नाही आहे. लॅनिआकिआ दीर्घिकासमूहातील दीर्घिका आणि द ग्रेट अट्रॅक्टर स्वतः एका महाकाय वस्तुमानाच्या दीर्घिकासमूहाकडे सरकत आहेत. याचे नाव आहे शापली दीर्घिका महासमूह. शापली दीर्घिकामहासमूहाचे वस्तुमान हे १० दक्षलक्ष अब्ज सूर्यांइतके असल्याचे सांगितले जाते. खरे तर शापली दीर्घिकासमूह हा अब्जावधी प्रकाशवर्षांच्या अंतरामधील सर्वात मोठा दीर्घिकामहासमूह असून विश्वाच्या आपल्या भागातील सर्व दीर्घिका त्याच्याकडे सरकत आहेत.