जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा ताबा मिळवून देण्यासाठी MIT करत आहे विविध प्रयोग ! वाचा !

एम आय टीच्या ड्रीम लॅबचे संशोधक एक असं यंत्र बनवत आहेत जे आपल्या स्वप्नांबरोबर संवाद साधू शकेल आणि या स्वप्नांमध्ये आपल्या आवश्यकतेनुसार बदल घडवून आणू शकेल. एम आय टी मधील संशोधक अॅडम होरोविझ म्हणतात कि आपल्या आयुष्यातील एक तृतीयांश भाग हा असा दुर्लक्षित भाग आहे ज्यामध्ये आपण आपले आयुष्य सुधारू शकतो आणि आपल्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू शकतो.

तुम्ही कुठल्याही विषयाबद्दल बोला. तुम्हाला तुमची स्मरणशक्ती सुधारायची असेल, सृजनशीलता सुधारायची असेल, परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील किंवा तुमचा दुसऱ्या दिवशीचा मूड चांगला ठेवायचा असेल. या सर्वासाठी तुम्हाला रात्री झोपेत काही गोष्टी कराव्या लागतील. होरोविझ म्हणतात.

ड्रीम लॅबच्या चमूने एक हातमोज्याप्रमाणे दिसणारे यंत्र निर्माण केलंय. हा हातमोजा (डॉर्मिओ) तुम्ही झोपेत जागृत अवस्थेतून अवचेतन अवस्थेत जात असताना (हिप्नोगाजिया या अवस्थेत असताना) तुम्हाला एक प्रकारचा सांकेतिक शब्द सांगतो. हा शब्द तुम्हाला आधीच ठरवून ध्वनिमुद्रित करावा लागेल. आणि हा शब्द ऐकून आपल्या स्वप्नामध्ये आवश्यक तो बदल घडून येऊ शकेल असं संशोधकांचे मत आहे. ड्रीम लॅबने केलेल्या एका प्रयोगामध्ये ५० व्यक्तींना हा हातमोजा घातला आणि वाघ हा शब्द उच्चारल्यावर त्या प्रयोगात सामील असलेल्या लोकांच्या स्वप्नात वाघ आला.

ड्रीम लॅब च्या अजून एका संशोधकाने (ज्युडिथ अमोरी ) शब्दाऐवजी गंध वापरून पहिला. हे यंत्र आपण जेंव्हा झोपेच्या एन ३ या पायरीला पोचतो त्यावेळी हे यंत्र ठराविक असा सुगंध सोडते. एन ३ हा आपल्या झोपेची अशी पातळी असते कि त्यामध्ये शरीराची आणि मानसिक झीज भरून येण्याची प्रक्रिया घडते. या पातळीमध्ये ठराविक सुगंध सोडल्याने शरीराची झीज चांगल्या प्रकारे भरून येते आणि आपल्या स्मृतींचे एकत्रीकरणदेखील चांगल्या प्रकारे होते आहे असे ज्युडिथ यांचे म्हणणे आहे.

एम आय टीच्या आणखी एका ल्युसिड ड्रीमिंग नावाच्या प्रयोगामध्ये लोकांना ते स्वप्नात असल्याची जाणीव करून दिली जाते जेणेकरून ते स्वप्नाचा ताबा घेऊन उडणे, गाणे इत्यादी प्रकार स्वप्नात करू शकतात. परंतु ल्युसिड ड्रीमिंग चा प्रयोग तितका यशस्वी झालेला नसून केवळ १% लोकच अशा प्रकारची स्वप्नांचा ताबा घेण्याची क्षमता ठेवतात असे शास्त्रज्ञ सांगतात.