जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

जपानचे सुरक्षा मंत्रालय बनवत आहे यु एफ ओ दिसल्यावर पाळावयाचे नियम !

अमेरिकेने UFO ( अन आयडेंटीफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट/संभाव्य
परग्रहवासीयांचे यान) संबंधित चित्रफीत जाहीर केल्यानंतर जपानच्या सुरक्षा मंत्रालयाने UFO दिसल्यावर वैमानिकांनी पालन करायचे नियम तयार करायला घेतले आहेत. या नियमांमध्ये UFO दिसल्यास त्यांचे ध्वनीचित्रमुद्रण कसे करावे, त्यांना कसा प्रतिसाद द्यावा (गरज पडल्यास) आणि त्यांच्या संबंधी काय माहिती गोळा करावी याबद्दल माहिती दिलेली असेल. UFO दिसल्यावर वैमानिकांचा गोंधळ उडण्याची शक्यता लक्षात घेऊन अशी नियमावली निर्माण करणे महत्वाचे आहे असे जपानच्या सुरक्षा मंत्रालयाला वाटते.

अमेरिकेने जाहीर केलेल्या चित्रफिती २००४ आणि २०१५ साली मुद्रित केलेल्या होत्या. या चित्रफितींमध्ये प्रचंड वेगाने उडणाऱ्या उडत्या तबकड्या दिसत असून या तबकड्या म्हणजे नेमकं काय आहे ते माहिती नसल्याचे अमेरिकन सुरक्षा विभागाने नोंदवले आहे.

एखादे परकीय विमान जपानच्या हद्दीच्या जवळ आल्यास परकीय वैमानिकाशी इंग्रजीमध्ये संवाद साधायची पद्धत आहे. जपानच्या हद्दीत जर विमान आलं तर सिग्नल शॉट्स मारून विमानाला जमिनीवर उतरायला भाग पडले जाते. हे नियम आणि या पद्धती UFO वर कितपत प्रभावी ठरतील हा प्रश्नच आहे, असं मंत्रालयाला वाटतं.

UFO जमिनीवरील रडारवर न दिसण्याची शक्यता आहे. परिणामी प्रशिक्षणासाठी किंवा गस्तीवर असलेल्या विमानांना ती सर्व प्रथम दिसण्याची शक्यता आहे. UFO दिसल्यास प्रशिक्षण ताबडतोब रद्द होईल आणि वैमानिक सुरक्षित अंतरावरून UFO ची माहिती गोळा करतील. असं मंत्रालयाने नोंदवलं.

“खरं सांगायचं तर माझा UFO वर विश्वास नाही. परंतु अमेरिकन सुरक्षा विभागाने अशा चित्रफिती जाहीर केल्याने त्यांचा अभ्यास काय म्हणतोय हे पाहणे महत्वाचे आहे” असं सुरक्षा मंत्री ‘कानो’ म्हणाले.
सुरक्षा मंत्र्यांच्या या वक्तव्यावर जपान सेंटर फॉर एक्सट्रा टेरेस्ट्रीअल इंटेलिजन्स (JCETI) च्या संचालकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. त्यांच्या मते जपानच्या वायुसेनेला आतापर्यंत सहा वेळा तरी UFO दिसलेले आहेत. जपानच्या सामान्य नागरिकांना देखील खूप वेळा UFO दिसल्याचं सांगण्यात येतंय.

JCETI दर महिन्याला दोन तीन चर्चासत्रे भरवते जिथे सामान्य नागरिक UFO पहिल्याच्या गोष्टी सांगतात आणि संबंधित छायाचित्रे एकमेकांना दाखवतात.