नोव्हेंबर 26, 2022

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

गेली ३३००० वर्षे पृथ्वी करत आहे ताऱ्यांच्या स्फोटानंतर उरलेल्या किरणोत्सर्गी अवशेषांमधून प्रवास ! नवं संशोधन !!

शास्त्रज्ञांनी केलेल्या नव्या संशोधनानुसार आपली पृथ्वी गेली ३३००० वर्षे ताऱ्यांच्या स्फोटानंतर उरलेल्या अवशेषांमधून प्रवास करत आहे. प्रोसीडींग्ज ऑफ नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस या नियतकालिकामध्ये ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी समुद्राच्या तळातून घेतलेल्या आयरन (लोह)-६० या आयसोटोपच्या सहाय्याने हे सिद्ध होत असल्याचं म्हटलं आहे. कारण आयरन – ६० हा आयसोटोप महाकाय ताऱ्यांच्या गर्भात तयार होतो आणि सुपरनोव्हा स्फोटांमध्ये बाहेर फेकला जातो. आयरन – ६० हा किरणोत्सर्गी पदार्थ असून, त्याचे विघटन व्हायला दिड कोटी वर्षे लागतात. या सर्व माहितीनुसार आपला ग्रह आंतरतारकीय मेघातून प्रवास करत असून ताऱ्यांच्या स्फोटात निर्माण झालेली धूळ सतत आपल्या ग्रहावर येत असल्याचे या शास्त्रज्ञांचे मत आहे.संशोधनानुसार आयरन -६० चे अडीच वर्षे ते साठ लाख वर्षे जुने आयसोटोप शास्त्रज्ञांच्या पाहण्यात आले आहेत. आयसोटोपच्या झालेल्या विघटनानुसार घेतलेला आयरन – ६० चा नमुना किती जुना आहे हे शोधता येऊ शकते. घेतलेल्या आयसोटोपच्या नमुन्यानुसार एका ठराविक कालावधीत निर्माण झालेले आयसोटोप निदर्शनास आलेले नाहीत. परिणामी हे आयसोटोप सुपरनोव्हामुळे निर्माण झाले नसावेत असंही शास्त्रज्ञांना वाटतं.