जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

गॅमा रे बर्स्ट !

गॅमा रे बर्स्ट हे विश्वातील खूपच अल्पायुषी, परंतु सर्वात प्रचंड असे स्फोट आहेत. यांचा कालावधी काही मिलीसेकंद ते काही मिनिटे इतकाच असतो. गॅमा रे स्फोटांचे तेज हे सुपरनोव्हाच्या तेजाच्या १०० पटीपेक्षा अधिक तेजःपुंज असतं. ‌तर सूर्याच्या तुलनेत यांचं तेज शेकडो अब्ज पट अधिक असतं. गॅमा रे स्फोटांच्या कालावधीवरून त्यांचे दोन प्रकार पडतात. पहिल्या प्रकारामध्ये त्यांचं आयुष्य दोन सेकंद ते काही मिनिटे इतकं असतं. जेव्हा एखाद्या महाप्रचंड तार्याचा अंत होऊन त्याचे रूपांतर कृष्णविवरामध्ये होते. त्यावेळेला असे मोठे स्फोट घडतात या स्फोटांना हायपरनोव्हा असेदेखील म्हटले जाते हे हायपरनोव्हा सुपर नोव्हाच्या शेकडो पटीने अधिक तेजस्वी असतात. शास्त्रज्ञांच्या मतानुसार प्रचंड चुंबकीय बल असलेल्या ताऱ्यांचा अंत होतेवेळी किंवा स्वतःभोवती वेगाने फिरणाऱ्या ताऱ्यांचा अंत होताना हायपरनोव्हा स्फोट घडतो.
परंतु छोट्या कालावधीचे गॅमा रे बर्स्ट हे जेव्हा दोन न्यूट्रॉन तारे एकत्र एकमेकांवर आपटून त्यांचे रूपांतर कृष्णविवरात होते किंवा एखादे कृष्णविवर जेव्हा न्यूट्रॉन तार्‍याला गिळंकृत करते, त्यावेळेला घडतात. हे स्फोट इतके प्रचंड असतात की त्यांच्या मुळे विश्वाच्या काळ अंतराळवरती लाटा उठतात. ज्याला ग्रॅव्हिटेशनल वेव्ह्ज किंवा गुरुत्वीय लाटा असं म्हटलं जातं.
अर्थात गॅमा रे बर्स्ट हे प्रचंड विनाशकारी असतात. जर आपल्या आकाशगंगेत एखादा गॅमा रे स्फोट झाला आणि त्याचे किरण जर सरळ पृथ्वीच्या दिशेने आले, तर खूप मोठा विनाश घडेल. परंतु सुदैवाने आतापर्यंत पाहिलेले गॅमा रे स्फोट हे पृथ्वीपासून प्रचंड अंतरावर असलेल्या दिर्घिकांमध्ये घडल्याचे पाहण्यात आले आहे. आपल्या आकाशगंगेसारख्या दिर्घिकेमध्ये गॅमा रे स्फोट हे किमान दहा हजार वर्षे ते कमाल दहा लाख वर्षे इतक्या कालावधीमध्ये एकदा घडू शकतात आणि थोडीशी ऊर्जा पृथ्वीच्या दिशेने येण्याची शास्त्रज्ञांना शक्यता आहे. यामुळे गॅमा रे स्फोटांमुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीला धोका पोहोचण्याची तितकी चिंता नाही.