जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

कोविड १९ हा आजार एवढ्या पटापट कसा पसरतो ? समजून घेऊया.

नमस्कार मंडळी, कोविड १९ च्या जगभरातील रोग्यांची संख्या सहा लाखाच्या वर पोचलेय आणि हा रोग इतक्या पटापट कसा पसरतोय. हा प्रश्र्न तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर आज थोडक्यात शोधायचा आपण प्रयत्न करूया.

या विषाणूसंबंधी केलेल्या काही जनुकिय संशोधनांमध्ये या विषाणूच्या बाह्य आवरणातील प्रथिन हे या विषाणूच्या प्रसारामागे मुख्य कारण सांगितलं गेलंय. तर काही संशोधक हे मानवी पेशींच्या भिंतीवरील रिसेप्टरचा (ज्याद्वारे विषाणू उतींमध्ये (एकसारखे काम करणाऱ्या पेशींचा संच) घुसतात ) अभ्यास करत आहेत. पेशींच्या भिंतीवरील रिसेप्टर किंवा विषाणूच्या बाह्य आवरणातील प्रथिन ब्लॉक करणारे औषधी रेणू शोधायचा सध्या प्रयत्न चालू आहे.

हा विषाणू त्याच्या स्पाईक प्रोटीन म्हणजेच आवरणावरील काटेरी प्रथिनांच्या सहाय्याने पेशींना संसर्गित करतो. हा संसर्ग घडवताना त्याला एका ठराविक एन्झाईमची आवश्यकता असते. कोविड १९ च्या विषाणूला लागणारं हे एन्झाईम फ्यूरिन या नावाने ओळखले जात असून, हे एन्झाइम कोरोना जातीतील इतर विषाणू संसर्गाकरीता वापरत नाहीत. हे संशोधन फार महत्त्वाचं आहे. कारण फ्युरिन हे मानवी शरीरातील बहुतेक अवयवांच्या उतींमध्ये सापडतं आणि यामुळेच हा विषाणू यकृत, फुफ्फुसे, छोटे आतडे इत्यादी विविध अवयवांवर हल्ला करू शकतो. यामुळेच जगातील काही विद्यापीठांमध्ये फ्युरिन ब्लॉक करू शकणाऱ्या औषधांवर संशोधन चालू आहे.परंतु सध्या पसरलेल्या कोविड १९ च्या रोगराईमुळे या संशोधनाला हवी तशी गती मिळत नाही आहे.

कोविड १९ च्या संसर्ग प्रक्रियेमधील दुसऱ्या निरीक्षणावर आधारित संशोधन टेक्सास मध्ये एक चमू करत आहे. कोविड १९ चा विषाणू हा पेशींच्या भिंतीवरील एसीई २ रिसेप्टरना चिकटतो आणि पुढे पेशीसंसर्ग घडवून आणतो. कोविड १९ चा हा बंध सार्सच्या संसर्गात होणाऱ्या बंधाच्या दहापट अधिक मजबूत असतो. त्यामुळे पेशींच्या भिंतीवरील एसीई २ रिसेप्टर ब्लॉक करू शकणारं औषध शोधायचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.

(नेचर मासिकातील लेखावर आधारीत)