नोव्हेंबर 26, 2022

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

कोरिअन शास्त्रज्ञांना १० कोटी तापमानाचा हायड्रोजन प्लाझ्मा २० सेकंदांपर्यंत टिकवून ठेवण्यात यश ! नवा जागतिक उच्चांक !!

कोरियन सुपर कण्डक्टींग टोकामाक ॲडव्हान्स्ड रिसर्च (KSTAR) फॅसिलिटीच्या शास्त्रज्ञांनी प्लाझ्मा आयनांचे दहा कोटी अंश सेल्सियस इतके उच्च तापमान २० सेकंद टिकवून ठेवण्यामध्ये यश मिळवले आहे. हा एक जागतिक उच्चांकच आहे. हा उच्चांक साध्य करताना शास्त्रज्ञांनी त्यांचा पूर्वीचा साडेआठ सेकंदाचा उच्चांक तोडला.

या शास्त्रज्ञांचा उद्देश्य सूर्याच्या गर्भातील परिस्थिती पृथ्वीवर निर्माण करून या तंत्रज्ञानाचा ऊर्जा निर्मितीसाठी काही उपयोग होऊ शकेल का याचा अभ्यास करणे हे आहे.

इतके प्रचंड तापमान गाठण्यासाठी शास्त्रज्ञांनी ‘सुपर कण्डक्टींग फ्यूजन डिव्हाइस’ या संयत्राचा वापर करून हायड्रोजनच्या आइसोटोपना उच्च तापमानाला तापवून त्यांना प्लाझ्मा स्थितीमध्ये आणले जाते. परंतु ही स्थिती अधिक काळापर्यंत टिकवून ठेवणे खूपच अवघड आहे. सूर्याच्या गर्भामध्ये अणु याच स्थितीमध्ये असावेत, असे शास्त्रज्ञांची अनुमान आहे आणि या प्रयोगातून शास्त्रज्ञ प्लाझ्माचे उच्च तापमानाला होणारे वर्तन अभ्यासत आहेत.

सूर्यामध्ये होणाऱ्या फ्युजन अभिक्रियांवरती मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये शास्त्रज्ञांनी उच्च तापमानाच्या प्लाझ्माला १.५ सेकंद इतक्या कालावधीवरून २० सेकंद इतक्या कालावधीपर्यंत टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे. हे प्रयोग यशस्वी झाल्यास ऊर्जेचा एक नवा आणि स्वस्त स्त्रोत आपल्याला उपलब्ध होईल आणि जीवाश्म इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होईल अशी आशा शास्त्रज्ञांना वाटते.