जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

कुठल्याही पदार्थातून आरपार जाऊ शकणारे सूक्ष्म कण – न्यूट्रिनो !

न्यूट्रिनो हे खूप सूक्ष्म कण असून त्यांचे वस्तुमान इतके कमी असते कि सुरुवातीला त्यांचे वस्तुमान शून्य असल्याचे मानले गेले होते. त्यांचे नाव न्यूट्रिनो ठेवण्यामागे त्यांचा विद्युत भार शून्य असणे हे कारण होते. न्यूट्रिनोंचे वस्तुमान (२.१४ ×१०(-३७वा घात)) इतर बहुतांश मूलभूत कणा पेक्षा खूपच कमी असते. त्यांचे गुरुत्वाकर्षण देखील खूप कमी असून ते सामान्य पदार्थामधून आरपार जातात. आपल्या शरीरातून प्रत्येक सेकंदाला ५० निखर्व ( ५००० अब्ज) न्यूट्रिनो पार होत असतात. .

पृथ्वीवरील न्यूट्रिनो सामान्यतः तीन प्रकारे तयार होत असतात. पृथ्वीवर येणारे सर्वाधिक न्यूट्रिनो हे सूर्यापासून निर्माण झालेले असतात. याशिवाय वातावरणावर होणाऱ्या वैश्विक किरणांच्या भडिमारामुळे तसेच अणुभट्ट्यांमधून देखील न्यूट्रिनो बाहेर पडतात. याशिवाय सूर्यमालेच्या बाहेरून देखील न्यूट्रिनो पृथ्वीवर येतात. मागील एका लेखामध्ये सुपरनोव्हा स्फोटांच्या काही तास आधी पृथ्वीवर संबंधित ताऱ्यामधून न्यूट्रिनो येतात हे आपण वाचलेच असेल.

न्यूट्रिनो हे सामान्य पदार्थांमधून आरपार जात असल्याने ज्या पदार्थांमध्ये इतर किरण जाऊ शकत नाहीत अशा पदार्थांचा अभ्यास करायला न्यूट्रिनोंच्या उपयोग होतो. यामध्ये सूर्याच्या तसेच आकाशगंगेच्या गाभ्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी यांचा उपयोग केला जात आहे. आकाशगंगेचा गाभ्याभोवती वायूचे दाट मेघ असल्यामुळे तसेच गाभ्याभोवती बरेच तेजस्वी तारे असल्याने गाभ्याबद्दल माहिती मिळवणे खूप अवघड आहे. परंतु न्यूट्रिनोंच्या साहाय्याने आपण आकाशगंगेच्या केंद्राचा अभ्यास करू शकतो. तसेच सूर्याच्या गाभ्यातून पृष्ठभागापर्यंत पोचायला फोटॉनला जवळजवळ ४०,००० वर्षांचा कालावधी लागतो मात्र हेच अंतर न्यूट्रिनो मात्र जवळजवळ प्रकाशाच्या वेगाने पार करू शकतो, यामुळे सूर्याच्या गाभ्याची माहिती मिळवण्यासाठी न्यूट्रिनो खूप उपयुक्त आहेत. त्याचप्रमाणे सुपरनोव्हाचा अभ्यास करण्यासाठीदेखील न्यूट्रिनो खूप महत्वाचे आहेत कारण सुपरनोव्हाच्या एकूण ऊर्जेपैकी ९९% ऊर्जा हि न्यूट्रिनोंच्या स्वरूपात बाहेत पडते. न्यूट्रीनोसंबंधी शास्त्रज्ञ बरेच प्रयोग करत आहेत. या प्रयोगांसंबंधी माहिती आपण लवकरच घेऊ.