जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

इमॅन्युएल शारपेंटीयर आणि जेनिफर डोडना यांना यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल

इमॅन्युएल शारपेंटीयर आणि जेनिफर डोडना या जोडीला काल सी आर आय एस पी आर (क्रिस्पर) हे जनुके संपादन करण्याचे तंत्रज्ञान शोधल्याबद्दल रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शास्त्रज्ञ आता वनस्पती प्राणी किंवा मानवाच्या डीएनएमध्ये अचूकतेने बदल घडवून आणू शकतात. परिणामी कर्करोगासारखे दुर्धर रोग बरे करण्याचे तसेच अनुवंशिकतेने आजार बरे करण्याचे सामर्थ्य या तंत्रज्ञानामुळे माणसाच्या हातात आले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

क्रिस्पर हे तंत्रज्ञान बॅक्टेरियाकडून विषाणूंसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिकारपद्धतीवर आधारित आहे. जेव्हा एखादा विषाणू बॅक्टेरिया मध्ये त्याचे डीएनए सोडतो त्यावेळी बॅक्टेरिया कॅस नाईन हे प्रथिन वापरून त्या विषाणूच्या डीएनएचे तुकडे करतात आणि या डी एन एचे तुकडे बॅक्टेरीयाच्या गुणसुत्रांमध्ये सामावून घेतले जातात. यानंतर डि एन ए मध्ये जोडलेल्या विषाणूंच्या जीन्सची नक्कल आर एन ए मध्ये केली जाते आणि हे आर एन ए कॅस नाईन सोबत जोडले जाऊन ते भविष्यात होऊ शकणाऱ्या विषाणूंच्या हल्ल्यापासून बचावासाठी वापरले जाते. परीणामी या बॅक्टेरीयाला किंवा त्याच्या वंशजांना पुन्हा कधीही या विषाणू पासून धोका उद्भवू शकत नाही.

आता कॅस नाईन या प्रथिनाबरोबर डी एन ए च्या भागाशी मिळतेजुळते आर एन ए जोडून शास्त्रज्ञ नेमक्या ठिकाणी डि एन ए तोडू शकतात. आपल्याला आवश्यक तो डि एन ए चा तुकडा या ठिकाणी जोडून शास्त्रज्ञ डी एन ए मध्ये हवा तो बदल घडवून आणू शकतात.

२०१२ साली सी आर आय एस पी आर (क्रिस्पर) तंत्रज्ञानाचा शोध लागल्यानंतर या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. शेतीच्या क्षेत्रामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून दुष्काळी भागात येऊ शकतील अशी पिके अथवा परभक्षींना सक्षमपणे तोंड देऊ शकतील अशी पिके बनवण्या वरती संशोधन चालू आहे. त्याचबरोबर कर्करोगावर नवे उपाय शोधण्याचे कामही या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चालू आहे. या तंत्रज्ञानामुळे विज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये एक नवे युग चालू झाले आहे, असे म्हटले तर हरकत नाही असे रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने हे पारितोषिक देताना म्हटले आहे.

काही महिन्यांपूर्वी आपण विज्ञानाच्या वाटसरूमध्ये क्रिस्पर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चीनमध्ये केल्या जात असलेल्या काही प्रयोगांबद्दल संक्षिप्तपणे माहिती घेतली होती.