जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार प्रकाश म्हणजे फोटॉनला काळ जाणवतच नाही ! का ते समजून घेऊया !!

काळापुढे कुणाचे काहीच चालत नाही असे आपण नेहमीच म्हणतो. पण या विश्वात अशा काही गोष्टी ज्यांच्यापुढे काळाचं काहीच चालत नाही . अशा काही गोष्टींपैकी एक म्हणजे फोटॉन. आपल्याला दिसणारा प्रकाश ज्या फोटॉन पासून बनलेला असतो ते फोटॉन प्रचंड वेगाने प्रवास करत असल्याने त्यांना काल जाणवत नाही. अगदी विश्वाच्या सुरुवातीला तयार झालेल्या फोटॉनना पण आजपर्यत १४ अब्ज वर्षे उलटून गेलेली असली तरीसुद्धा.

आईन्स्टाईनच्या थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीनुसार जसा आपला वेग जातो तसतसे आपले घड्याळ हळू हळू प्रवास करू लागते. आपला वेग प्रकाशाच्या वेगाच्या जितक्या जवळपास पोचेल तितका घड्याळाचा वेग कमी होईल म्हणजेच आपला वेळ हळूहळू जाऊ लागेल. याचबरोबर आपले वस्तुमान देखील वाढत जाईल. पण तूर्तास आपण तिकडे दुर्लक्ष करूया.

आपण जर g म्हणजे ९.८ मी/से२ इतक्या त्वरणाने प्रवास करत राहिलो तर काही काळाने आपला वेग प्रचंड होईल आणि आपण आपल्या आयुष्यात काही अब्ज प्रकाशवर्षे इतके अंतर पार करून जाऊ. अर्थात या काळात पृथ्वीवर अब्जावधी वर्षे उलटून गेलेली असतील. आपण ज्यावेळी प्रकाशाच्या वेगाने प्रवास करू त्यावेळी आपल्याला काळ मुळीच जाणवणार नाही आणि अवकाश सुद्धा. त्याचबरोबर अगदी कुठलेही अमर्याद मोजमाप यावेळेला शून्याच्या जवळपास जाऊन पोचते आणि सरते शेवटी शून्यच होते.

पण रिलेटिव्हिटीच्या सिद्धांतानुसार कुठलीही वस्तुमान असलेली गोष्ट प्रकाशाच्या वेगाने प्रवास करू शकत नाही. कारण असे करताना वस्तुमान हे अमर्याद वाढेल आणि लागणारी ऊर्जा देखील अमर्याद असेल. परंतु प्रकाशाला म्हणजे फोटॉनला काहीच वस्तुमान नसल्याने तो या वेगाने प्रवास करतो आणि त्यांच्यासाठी कापलेले अंतर आणि गेलेला काळ हा शून्यच असतो.

वाचायला खूपच मनोरंजक पण पूर्णपणे समजायला थोडं अवघड आणि काहीसे अविश्वसनीय वाटतंय का ? रिलेटिव्हिटी चा सिद्धांतच मुळात समजायला अवघड आहे. मला सुद्धा थोडंसं क्लिष्ट आणि खूपच आश्चर्यजनकच वाटतंय . पण आपण याबद्दल अधिकाधिक वाचत राहू. जेणेकरून आपल्याला रिलेटिव्हिटी चा सिद्धांत चांगला समजेल.